'सासरच्यांचे टोमणे हा वैवाहिक आयुष्याचा भागच'

January 01, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'सासरच्यांनी टोमणे मारणे व उपहासाने बोलणे हा वैवाहिक आयुष्याचा भागच आहे आणि प्रत्येक कुटुंबात हे पाहायला मिळते', असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने एका वृद्ध दाम्पत्याला अटकेपासून संरक्षण देताना नुकतेच नोंदवले. मात्र, आरोपी दाम्पत्याने आपले पासपोर्ट पोलिसांत जमा करावे, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीविना देशाबाहेर जाऊ नये आणि या न्यायालयाच्या हद्दीबाहेर जाऊ नये, अशा अटीही न्या. माधुरी बरालिया यांनी त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना घातल्या. सून गीताच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी तिचे ८० वर्षीय सासरे कांतीलाल गुप्ता व ७५ वर्षीय सासू मालती गुप्ता यांच्याविरोधात २६ सप्टेंबरला व फसवणुकीच्या आरोपांसह अन्य आरोपांखाली एफआयआर नोंदवला. दुबईत राहत असलेला तिचा पती अजय हाही आरोपी आहे (सर्व नावे बदललेली आहेत). अजय हा तिचा शाळकरी मित्रच आहे. 'माझी इच्छा नसताना घरच्यांनी माझा विवाह निश्चित केला आणि २८ मे २०१८ रोजी मी अजयशी विवाहबद्ध झाले. मात्र, विवाह होणार असतानाच अजय हा गुप्ता यांचा स्वत:चा मुलगा नसून तो दत्तक घेतलेला मोलकरणीचा मुलगा असल्याचे आम्हाला कळले. लग्नाआधी साखरपुड्याच्या कार्यक्रमात सासरच्यांनी माझ्या अंगावर सोन्याचे दागिने तेवढ्यापुरते चढवले आणि नंतर लगेच काढून घेतले. त्याउलट अजयला माझ्या आई-वडिलांनी दहा तोळ्यांची सोन्याची चेन भेट दिली. आमच्या विवाहाचा खर्चही माझ्या पालकांनीच केला. विवाहानंतर पहिल्या दिवसापासूनच सासरच्यांनी माझा छळ सुरू केला. फ्रीजला हात लावू न देणे, बाहेरच्या खोलीत झोपायला सांगणे, बेडरूममध्ये झोपले असताना अंगावरून ब्लँकेट काढून घेणे असे प्रकार सासू करत होत्या. या सर्व गोष्टी दुबईत असलेल्या पती अजय सांगितल्या की तोही उपहासाने बोलायचा', असा आरोप गीताने एफआयआरमध्ये केला आहे. 'विवाहानंतर सून अवघ्या दहा दिवसांसाठीच आमच्यासोबत राहिली. ती वारंवार दुबईला आमच्या मुलाकडे जायची आणि मुंबईत परतल्यानंतर माहेरीच रहायला जायची. तिचा प्रेमविवाहच आहे. विवाहापूर्वी ती नेहमी घरी यायची आणि अजय हा आमचा दत्तक मुलगा असल्याची तिला पूर्ण कल्पना होती. विवाहाचा खर्चही दोन्ही बाजूंनी अर्धा-अर्धा केला होता. त्यामुळे सूनेच्या आरोपांत तथ्य नाही. शिवाय पोलिसांनी आम्हाला समन्स बजावलेच नाही. आमचे बँक खाते गोठवल्याची नोटीस मिळाल्यानंतरच आम्हाला या एफआयआरची माहिती कळली', असा युक्तिवाद सासू-सासऱ्यांतर्फे करण्यात आला. अखेरीस दोन्ही बाजू ऐकल्यानंतर 'एफआयआरमधील आरोप हे सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत. फिर्यादी काही दिवसच अर्जदारांसोबत राहिली. सासरच्यांनी टोमणे मारणे किंवा उपाहासाने बोलणे हा वैवाहिक आयुष्याचा भागच असतो आणि प्रत्येक कुटुंबात हे असते. त्यामुळे अशा आरोपांच्या बाबतीत या वृद्ध दाम्पत्याच्या पोलिस कोठडीतील चौकशीची आवश्यकता नाही', असे निरीक्षण नोंदवत न्यायाधीशांनी या दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: