नाशिक: १५ हजार शेतकऱ्यांचा भव्य वाहन मार्च; आज मुंबईत धडकणार
नाशिक: केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे व शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा व शेतीमालाला आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्या या आणि अशा इतर मागण्यांसाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज नाशिक ते मुंबई असा १५,००० शेतकऱ्यांचा भव्य राज्यव्यापी शेतकऱ्यांचा मार्च काढण्यात आला आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे हा देखील या मोर्चाचा उद्देश आहे. राज्यभरातील १०० हून अधिक संघटनांच्या वतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे. विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत. नाशिक येथून निघालेला हा वाहन मार्च आज इगतपुरीजवळ घाटनदेवी येथे रात्री मुक्कामाला होता. त्यानंतर आज सकाळी ९ वाजता घाटनदेवी येथून निघून हे हजारो शेतकरी कसारा घाट उतरून मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. आझाद मैदानात महामुक्काम आंदोलन दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे महामुक्काम सत्याग्रह करण्यात येत आहे. यात किसान सभेचा हा वाहन मोर्चा सामील होईल. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा आयोजित केला आहे. क्लिक करा आणि वाचा- २५ जानेवारीला आझाद मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीतील नेते आणि डावे, लोकशाही पक्ष यांचे प्रमुख नेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करणार आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: